Saturday , October 19 2024
Breaking News

मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सफल होऊ देणार नाही

Spread the love

राजू पोवार : शिग्गावमध्ये शेतकर्‍यांचे आंदोलन
निपाणी (विनायक पाटील) : अतिवृष्टी महापूर आणि कोरोनामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षापासून सुरू असलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांना जगणे मुश्किल झाले आहे. शासनातर्फे शेतकर्‍यांसाठी अनेक योजना सुरू असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नाही अनेक गावातील खर्‍या लाभार्थ्यांना पिकाच्या नुकसानीची भरपाई, विज बिल, घरांचा सर्वे पूर्ण झालेला नाही. केवळ आश्वासन देणार्‍या मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सफल होऊ देणार नसल्याचे मत, चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा. शेती पंपसेटना नियमितपणे वीजपुरवठा करा यासह विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या शिग्गावमधील (हावेरी) निवासस्थानाला घेराओ घालण्यासाठी निघालेल्या शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सोडून दिल्यावर पुन्हा रयत संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी शिग्गाव येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन केले. त्यावेळी शेतकरी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नापा पुजारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पोवार म्हणाले, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. वीजेचे दर वाढल्याने शेती डोईजड ठरत आहे. नाचणा, ज्वारीसह 21 पिकांना हमीभाव जाहीर करावा. खरेदी केंद्रे सुरु करावीत. वीजेची समस्याही दूर करावी, असा आदेश आहे. पण अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्री बोम्मई समस्या मार्गी लावण्याऐवजी शेतकर्‍यांना पिटाळून लावून आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार आहे. यापुढील काळात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकत्रित घेऊन सरकार विरोधाची लढाई लढण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येऊन संघटनेला सहकार्य करावे.
आंदोलनावेळी शेतकर्‍यांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. त्यानंतर हावेरीच्या जिल्हाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सध्या आचारसंहिता असल्याने मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी भगवंत गायकवाड, सर्जेराव हेगडे, बाळासाहेब पाटील, कलगोंडा कोटगे, बाळासाहेब मगदूम, इराण्णा ससानट्टी, पद्मण्णा उंड्री, वसंत पांढरोटी, प्रकाश तेरदाळ, मल्लाप्पा अंगडी, आदम जुरदारे, राजेसाब जुरदारे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे नेते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *