बेळगाव : हलगा येथील सुवर्ण सौध परिसरात काल मंगळवारी शेवया वाळत घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुवर्ण सौध परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत पाहणी केली. सुवर्णसौधच्या देखभाल, स्वच्छता व सुरक्षितेबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
सुवर्णसौधची व्यवस्था सांभाळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कामगारांशी चर्चा केली. सुवर्ण सौध परिसरात शेवया वाळत घालण्याचा प्रकार घडला आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या घटनां घडू नयेत याची काळजी घेतली जावी. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. कामगारांनी स्वच्छतेसह इतर नियमित देखभालीची कामे शिस्तबद्ध व नीटपणे करावीत. सुरक्षेबाबत प्रत्येकाचे ओळखपत्र तपासणी करण्यात यावी. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला संबंधित अधिकार्याला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा ही त्यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते संजीवकुमार हुलकाई, सहायक कार्यकारी अभियंते भीमा नाईक, पोलीस अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.