बेळगाव : बेळगावसह संपूर्ण राज्य हादरवून सोडलेल्या कुवेम्पूनगर तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष असल्याचा निकाल धारवाड येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.
बरोबर ७ वर्षांपूर्वी २०१५मध्ये बेळगावातील कुवेम्पूनगरातील एका महिलेचा आणि तिच्या २ मुलांचा अनैतिक संबंधातून खून केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिला आहे. या प्रकरणी बेळगावातील दुसऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला निकाल खंडपीठाने फेटाळला लावत पूर्वी निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. न्या. के. एस. मदगल, एम. जी. एस. कमल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. बेळगावातील एपीएमसी पोलिसांच्या हद्दीत कुवेम्पूनगर येथे हे तिहेरी हत्याकांड घडले होते. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर बेळगावच्या दुसऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. जिल्हा सत्र न्यायालयाने १६ एप्रिल २०१८ रोजी प्रवीण भट्ट याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, १६ ऑगस्ट २०१५ रोजी पहाटे कुवेम्पूनगरातील एक महिला आणि तिच्या २ मुलांचा निर्घृण खून करण्यात आला होता. रीना मालगत्ती, तिचा मुलगा आदित्य आणि मुलगी साहित्या यांचा खून करण्यात आला होता. त्यामुळे बेळगावसह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. आरोपींच्या त्वरित अटकेसाठी पोलिसांवर मोठा दबाव आला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत २४ तासांत आरोपी प्रवीण भट्टला अटक केली होती. आरोपी प्रवीण आणि हत्या झालेली रीना मालगत्ती यांच्यातील अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. शहरातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकत असलेल्या प्रवीण भट्टने रीना आणि तिच्या दोन कोवळ्या मुलांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले होते. मूळचा उत्तर कन्नड जिल्ह्यातील असलेल्या पालकांसमवेत प्रवीण बेळगावच्या कुवेम्पूनगरात अनेक वर्षांपासून रहात होता. खुनाच्या साधारण एक वर्ष आधी प्रवीण आणि रीनामध्ये स्नेहसंबंध जुळून आले होते. कापडाचा व्यापारी असलेला रिनाचा पती रितेश मालगत्ती आठवड्यातून ३-४ दिवस घराबाहेरच असायचा. त्याच्या गैरहजेरीत रीना प्रवीणला घरी बोलावून त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवायची. रितेशच्या अनुपस्थितीत शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून प्रवीण कधीही रिनाच्या घरी समोरच्या दरवाजाने जात नसे. दोरीवरून तिच्या घरी उतरून तिला भेटत असे. खून झालेल्या दिवशीही तो रात्री २ वेळा रिनाला भेटल्याचे सिद्ध झाले होते. पती घरी नसताना रीना प्रवीणला वारंवार घरी बोलावून शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होती. त्यातूनच १६ ऑगस्ट २०१५ रोजी पहाटे प्रवीणने आधी रिनाच्या खून केला. त्यावेळी मुले जागी झाल्याने ती कोणाला तरी सांगतील या भीतीने मुलांना पाण्याच्या बादलीत तोंड बुडवून ठार केले असा आरोप एपीएमसी पोलिसांनी त्याच्यावर ठेवला होता. जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात प्रवीण अपिलात गेल्यावर उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने या प्रकरणाची सविस्तर सुनावणी करून प्रवीण निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …