Monday , December 23 2024
Breaking News

संकेश्वरात आगीच्या दुर्घटनेत स्टेशनरी-किराणा दुकानाचे लाखोंचे नुकसान

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता येथील अरविंद कुलकर्णी यांचे सेंट्रल स्टोअर्स आणि गजानन रत्नप्पा मेहतर यांच्या किराणा दुकानाला आज सकाळी ६ वाजता शाॅर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली यांची चौकशी संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी करताहेत. आगीच्या घटनेविषयी समजलेली माहिती अशी आज सकाळी ६ वाजता अरविंद कुलकर्णी यांच्या सेंट्रल स्टोअर्स दुकानातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे पाहून गांधी चौक, नेहरु रस्ता आणि सुभाष रस्ता येथील व्यापारी लोक मोठ्या संख्येने जमा झाले. लोकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने ताबडतोब संकेश्वर अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशामक दलाने तब्बल चार तास शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणण्याचे कार्य केले. आगीच्या दुर्घटनेत अरविंद कुलकर्णी यांच्या सेंट्रल स्टोअर्स दुकानातील वह्या, पेन, कागदी ताव, स्टेशनरी साहित्य जळून खाक झाले आहे. अदमासे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अभिजित कुलकर्णी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, आगीची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली अद्याप समजू शकलेले नाही. शाॅर्ट सर्किटने आग लागली लागल्याचे समजते.दुकानात किंमती स्टेशनरी साहित्य होते ते आगीत भस्मसात झाले आहे. त्यामुळे आंमचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

किराणा मालाचे नुकसान..

गजानन रत्नप्पा मेहतर यांचे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी ‌पडले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दुकानाचे मालक गजानन मेहतर म्हणाले, नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. आमच्या दुकानातून शाॅर्ट सर्किट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विज वाहिनी दुकानात कोठेच तुटलेली दिसत नाही. आगीत दुकानातील तांदूळ, साखर, गोडेतेल, डाळी, मसाला पदार्थ जळून खाक झाले आहे. अदमासे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

फटाक्यांच्या दुकानाला आग..

नेहरु रस्ता येथील विनायक कुलकर्णी यांचे सेंट्रल स्टोअर्स दुकान फटाक्यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे गावात फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याची जोरदार चर्चा होताना दिसली. आगीची घटना घडली तेंव्हा फटाके फुटण्याचा आवाज होत असल्याची चर्चा देखील जोरदारपणे होतांना दिसली. यापूर्वी येथील रंगाची चावडी जवळच्या गंजी यांच्या फटाक्यांच्या दुकानाला आग लागून एक युवक होरपळून मरण पावला होता. तदनंतर ही दुसरी घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

आठ लाख रुपये जळाले…..

दुकानातील साहित्य खरेदीसाठी दुकानात ठेवलेले रोख आठ लाख रुपये आगीच्या दुर्घटनेत जळाल्याचे दुकान मालकाने सांगितले.

घटनास्थळी भेट…

नेहरु रस्ता येथील दोन दुकानांना आग लागल्याचे समजताच संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला यांनी भेट देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले. माजी खासदार रमेश कत्ती यांनी घटनास्थळी धावती भेट देऊन पाहणी केली.

फर्लांगभर दूर अग्निशमन..

संकेश्वरच्या जुन्या गावातील नेहरु रस्ता ही बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. नेहरु रस्ता तसा अरुंद असल्यामुळे येथे मोठी वाहने जावू शकत नाहीत. आजच्या आग दुर्घटनेप्रसंगी अग्नीशामक दलाचे वाहन फर्लांगभर दूर उभे करुन अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे कार्य करताना दिसले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणण्याचे कार्य केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सेंट्रल स्टोअर्स आणि मेहतर किराणा दुकाना लगत कापड दुकान,किराणा दुकान आहेत. अन्य दुकानापर्यंत आग पसरण्यापूर्वीच आग आटोक्यात आणली गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. संकेश्वर पोलिसांत आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

Spread the love  हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *