बेळगाव : केंद्र सरकारने अन्नधान्य आणि डाळींवर 5% वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लादल्याचा निषेधार्थ बेळगावातील व्यापार्यांनी आज रविवारपेठसह बाजारपेठ बंद ठेवून हरताळ पाळला.
आज बेळगावची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवारपेठेतील सर्व व्यापार्यांनी एक दिवस संपूर्ण व्यवसाय बंद ठेवून जीएसटी लादल्याचा निषेध केला. अलीकडेच केंद्र सरकारने अन्नधान्य आणि डाळींवर जीएसटी कर लावला आहे. त्यामुळे अन्नधान्यांच्या किमती गगनाला भिडणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने गोरगरीब आणि व्यापार्यांचे हाल होणार आहेत. जीएसटी परिषदेने तत्काळ आपला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी व्यापार्यांनी केली.
दरम्यान, आज शनिवार बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठ बंद राहिल्याने ग्राहकांची अडचण झाली. ग्राहक व व्यापारी नसल्याने एरव्ही दिवसभर गजबजणारी रविवार पेठ आज सुनसान झाली. वर्दळीअभावी तेथे शुकशुकाट पसरला होता. व्यापार्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून केंद्र सरकारच्या जीएसटी आकारणीच्या निर्णयाचा निषेध केला.