Friday , November 22 2024
Breaking News

खा. धैर्यशील माने यांच्या घरावर 25 जुलै रोजी शिवसैनिकांचा मोर्चा

Spread the love

कोल्हापूर : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता कोल्हापुरात देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
येत्या २५ तारखेला आपण हजारो शिवसैनिकांना घेऊन धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. तसेच गद्दारी का केली याचा जाबही विचारणार आहोत, अशी भूमिका मुरलीधर जाधव यांनी घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

यावेळी जाधव म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील माने आणि आदित्य ठाकरे यांच्यात कधीही फरक केला नाही. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचा मान-सन्मान केला. त्यामुळे धैर्यशील माने वाटेल तेव्हा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटायला जात होते. त्यांना लागेल तसा निधी उद्धव ठाकरेंकडून दिला जात होता. तरीसुद्धा माने यांनी गद्दारी केली. त्यामुळे येत्या २५ तारखेला मी तमाम शिवसैनिक आणि मतदारांना घेऊन धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. तसेच त्यांनी गद्दारी आणि बंडखोरी का केली? याबाबत त्यांना जाब विचारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही” असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, त्यामुळे मोर्चा कसा काढणार? पोलीस आणि शिवसैनिक आमने-सामने आल्यास तुमची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारला असता मुरलीधर जाधव म्हणाले, “आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्यासमोर तुम्ही केंद्रीय दल आणा किंवा इतर कोणतंही दल आणा, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तो कुणाला घाबरत नाही. आम्ही काही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही आणि शिवसेना आमची आई आहे. आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर आम्ही ते उघड्याडोळ्यांनी पाहू शकत नाही. जशास तसे उत्तर देणार. एक-एक शिवसैनिक समोरच्या १०० जणांना भारी असतो, निश्चितपणे आम्ही मोर्च्याच्या माध्यमांतून उत्तर देणार आहोत. गद्दाराला शिवसेनेत अजिबात क्षमा नाही, त्यामुळे २५ तारखेचा मोर्चा अलौकिक असणार आहे” असंही जाधव म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *