बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले.
बेळगाव येथील पोलीस आयुक्तालयात प्रसार माध्यमांशी बोलताना शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, सुळेभावी गावात काल रात्री 6 ते 7 जणांच्या टोळक्याने दोघांची हत्या केली. मीही घटनास्थळी जाऊन तपासणी केली असून अद्याप तपास सुरू आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश, मारिहाळ सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. प्रकाश हुंकारी-पाटील आणि महेश मुरारी यांची तीक्ष्ण हत्यारांनी हत्या करण्यात आली. या प्रकरणी सध्या सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे एकाच समाजातील आहेत. काही तर दूरचे नातेवाईकही आहेत. वैयक्तिक वैमनस्यातून या हत्या झाल्याची माहिती आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. अटक करण्यात आलेले आरोपी 20 ते 25 वयोगटातील आहेत. ते लहानमोठ्या नोकऱ्या करायचे, काही बेळगावात खोल्यांमध्ये राहायचे. दोन-तीन वर्षांपासून सगळे एकत्र चालत होते असे त्यांनी सांगितले.हे सहा लोक एकाच वेळी करत असलेल्या कामाबद्दल माहिती देताना पोलीस आयुक्त बोरलिंगय्या म्हणाले, अशी माहिती आहे की हे आरोपी हिंसक रील बनवत होते. या संदर्भातही चौकशी सुरू आहे. खून झालेला महेश मुरारी 2019 मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता. हत्येपूर्वी त्यांच्या डोळ्यात चटणीपूड टाकल्याबाबत तपास सुरू आहे. ही घटना रात्री 8.45 ते 9 च्या दरम्यान घडली असून घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. हत्या करण्यात आलेल्या महेश मुरारी याचा गोकाकच्या टायगर गँगशी असलेला संबंधही तपासण्यात येत आहे. यापूर्वीच ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला प्रकाश पाटील यांने धमकी दिल्याचीही माहिती आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.