भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांचे पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना निवेदन
बेळगाव : शेतकरी व पशुपालकांसाठी त्रासदायक ठरलेल्या लम्पिसदृश्य जनावरांच्या कातडीवरील गाठीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना देण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून खानापूर तालुक्यातील जनावरे लम्पिसदृश्य आजाराने त्रस्त आहेत. खानापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी हा पशुधनावर आपली उपजीविका करतो. आपल्या पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होतो परिणामी बळीराजा आर्थिक संकटात जात आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे, असे डॉ.सोनाली सरनोबत म्हणाल्या.
तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात या आजारावर जास्तीत जास्त जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.
लम्पि रोग हा गुरांचा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. हा आजार जास्त बळावला तर त्यात गुरांचा मृत्यू होतो. या विषाणूचा संसर्ग मानवावर होत नसलातरी त्यामुळे पशुपालनाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम पशुपालनावर व त्यातून होणाऱ्या उत्पादनावर होत आहे. डॉ. सरनोबत यांच्या समस्या निवारण केंद्रात गुरांच्या त्वचेसंबंधी नोड्युल रोगाच्या प्रतिबंधक होमिओपॅथी औषधे उपलब्ध आहेत. संबंधित पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले.