जर पुस्तके बोलू लागली तर.. त्यांना कुणी बोलतं केलं तर.. हा शालेय निबंधाचा विषय अजिबात नाही. कसं शक्य आहे ते? होय, या प्रश्नाचे उत्तरही शक्य आहे. आजरा तालुक्यातील हातिवडे सारख्या गावातील दशरथ पाटील यांनी आपला आवाज मराठी साहित्याला दिला अन् चक्क पुस्तकं हजारो कानांपर्यंत बोलती झालीत. ही किमया पाटीलसरांच्या प्रभावी आवाजाने, दमदार अभिवाचनाने साधली गेलीय. यु-ट्यूब चॕनेलवरील https://youtube.com/@bolati_pustake ‘बोलती पुस्तके’ या वर आपणही ऐका हा पुस्तकांचा आवाज..! जेट एअरवेजमधील नोकरीच्या निमित्तानं हातिवडे सुटलं आणि पाटीलसर नव्या मुंबईत स्थिरावले. २२ वर्षांच्या नोकरीत माय मराठीचा तसा वावर कमीच! कारण, इंग्रजी मावशीवरच सारी भाषेची आणि कारभाराची भिस्त ठरलेली. त्यामुळे मराठी साहित्य, त्यामधील कथासंग्रह, कादंबऱ्या, विशेषतः ग्रामीण ढंगातील कथा यांचा संबंध केवळ शालेय आणि काही महाविद्यालयीन जीवनात आलेला.
सध्याच्या स्मार्ट मोबाईलच्या जमान्यात नवी तर सोडाच, जुनी वाचन संस्कृतीही घसरत जाणारी, चिंतेची बनलेली साधी वर्तमानपत्रेही मोबाईलच्या जमान्यात निपचित पडत चाललेली. कधी काळी ओसंडून वाहणारी ग्रंथालये सध्या दर्दी वाचकांची वाट पाहून कंटाळली आहेत.
तीन वर्षापूर्वी कोरोना नावाचा अदृश्य विषाणूने समस्त भू-तलावरील मानवाला आपल्या अस्तित्वाने त्याचे तोकडेपणा आणि नवी जीवनपद्धती शिकवून गेला. आख्खं जगच घरी थांबलं. घरी बसून करायचे काय? वेळ तरी कसा घालवायाचा? यातूनच केवळ ‘टाईमपास’ म्हणून पाटीलसरांनी नाट्यमयरित्या मराठी साहित्य वाचायला सुरुवात केली. दहावीत असणाऱ्या त्यांचा मुलगा ओंकारने ते अभिवाचन यु-ट्यूबवर अपलोड केलं आणि त्या टाईमपास वाचनाला जोरदार कलाटणी मिळाली.*
“बोलती पुस्तके” या वाहिनीचा जन्म झाला आणि जुन्या अनुभवी कसदार प्रसिद्ध लेखकांच्या कथा, कादंबऱ्यांबरोबरच नव्या उमेदीच्या लेखकांच्या साहित्याचा गोतावळा वाढत गेला. हजारो पुस्तकांना स्वतःचा असा हा आवाज मिळाला. लिखित शब्दांना बोलतं करण्याचं कसब, त्यातील प्रसंगानुरुप गेयता, पात्रानुरुप संभाषण श्रोत्यांना भुरळ घालू लागलं. अनेकांनी यापूर्वी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, प्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम यांची पुस्तके वाचली होती. पण, या अभिवाचनाने ती पुन्हा एकदा जिवंत झालीत आणि प्रत्यक्ष श्रोत्यांशी थेट बोलू लागलीत. हे यश होतं दशरथ पाटीलसरांच्या आवाजाचं..!
‘बोलती पुस्तके’ या त्यांच्या कल्पकतेनं नव्या साहित्य ‘श्रवण संस्कृती’ ला बळ मिळालं आहे आणि मिळत आहे. हे त्यांच्या वाढत जाणाऱ्या सदस्य संख्येवरुन आणि प्रतिक्रियांवरुन दिसते. ओंकार त्यांना ‘श्रवण संस्कृती’ वाढवण्याच्या चळवळीत तांत्रिकदृष्ट्या मदत करत असतो. ‘जितकं कसदार लेखन तितकंच दमदार अभिवाचन..!’ हे अनुभवायचं असेल तर जरुर ‘बोलती पुस्तके’ चा आवाज एकदा ऐकाच..!
पुस्तकांना बोलतं करणारे दशरथ पाटील; ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद..!
– प्रशांत सातपुते