बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांना माहिती
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी बंदी नाही, पण त्यावेळी परिस्थितीचा फायदा घेऊन सीमाभागात गडबड करण्याचा काहींचा डाव असल्याची माहिती आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना रोखलं अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. भविष्यात महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात यावं यासाठी आमंत्रण पाठवणार असल्याचंही ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न तापला असताना राज्याच्या दोन मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखलं होतं. त्यानंतर हा मुद्दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मांडला होता. त्यावर बोलताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्राच्या गावांवर कर्नाटकने दावा केल्यानंतर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगावला जाणार होते. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना येण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर राज्याच्या या मंत्र्यांचा दौरा रद्द झाला होता. हा विषय आज अमित शाह यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना बसवराज बोम्मई म्हणाले की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आल्यानंतर त्याचा फायदा घेत बेळगावात काही संघटनांच्याकडून गोंधळ घालण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांना येण्यापासून रोखलं. भविष्यात त्यांना मी आमंत्रण देणार आहे.”
बेळगावातील अधिवेशन पहिला बंद करा : संजय राऊत यांची मागणी
आज दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी जरी चर्चा केली असली तरी राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, “या बैठकीत दोन्ही राज्यांनी एकमेकांवर दावा करु नये असं ठरलं असलं तरी महाराष्ट्राचा बेळगाववर दावा नाही, कारण बेळगाव हे आमचंच आहे. उलट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगलीवर दावा केला. त्यामुळे कर्नाटकने पहिला बेळगावातील अधिवेशन बंद करावं. राम मंदिराचा प्रश्न सुटतो, पण सीमाभागाचा प्रश्न का सुटत नाही? सीमाभागातून कर्नाटकने पोलिस मागे घ्यावेत आणि त्या ठिकाणी केंद्रीय फोर्स ठेवण्यात यावी.”