Sunday , July 26 2026
Breaking News

शिवकुमार – सिद्धरामय्या आज दिल्लीत

Spread the love

 

मंत्रिमंडळ यादीला अंतिम स्वरूप, उपमुख्यमंत्री पदावर चर्चा

बंगळूर : नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेसंदर्भात काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार डी. के. शिवकुमार आज (सोमवारी) दिल्लीला रवाना झाले. मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी यादी असल्याने मंत्रिमंडळ रचना काँग्रेस नेतृत्वापुढे मोठे आव्हान ठरले आहे.

डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये स्थान मिळवण्यासाठी अनेक आमदार आणि माजी मंत्री जोरदार प्रयत्न करत आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी काही आमदारांकडून होत असताना, सिद्धरामय्या सरकारमधील विद्यमान मंत्री पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

बुधवारी होणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिमंडळातील सदस्यांचाही शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १० ते १५ मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिपदासाठी इच्छुकांची यादी घेऊन सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार दिल्लीला रवाना झाले असून, आपल्या समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी ते हायकमांडकडे आग्रह धरणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री (डीसीएम) पदांबाबतही संभ्रम कायम आहे. किती उपमुख्यमंत्री पदे निर्माण करावीत यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या विषयावरही दिल्लीतील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री पदासाठी एम. बी. पाटील, जमीर अहमद खान, प्रियांक खर्गे, जी. परमेश्वर आणि के. एच. मुनीयप्पा यांची नावे चर्चेत असून, यापैकी काही नेते हायकमांड पातळीवर लॉबिंग करत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मंत्रिपदाच्या आशेने अनेक माजी मंत्री आणि आमदारांनी रविवारी डी. के. शिवकुमार यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणीही त्यांनी केली.

संतोष लाड, प्रियांक खर्गे, के. एच. मुनीयप्पा, अशोक पट्टन, मंकाळ वैद्य, एम.बी. पाटील, रूपा शशिधर, मधू बंगारप्पा, तन्वीर सेठ आणि दिनेश गुंडूराव यांच्यासह अनेक नेत्यांनी डी.के. शिवकुमार यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *