कुदनूर : नूतन वर्ष २०२३ च्या आरंभीच कुदनूर (ता. चंदगड) येथील शशिकांत शिवराम सुतार व बंधू यांच्या तीन कारखान्यांना भीषण आग लागली. सिद्धेश्वर सॉ मिल, सिद्धेश्वर ऑईल मिल आणि शिवराज फॅब्रिकेटर्स आग लागलेल्या कारखान्यांची नावे आहेत. या आगीत कारखान्यात बांधलेल्या दोन गोट व तीन दुचाकी जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
मंडल अधिकारी शरद मगदूम, पोलीस पाटील नामदेव लोहार, तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यात एक कोटीपेक्षा रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.१) पहाटे घडली. शशिकांत सुतार, त्यांचे बंधू व कुटुंबीय गेली अनेक वर्षे कुदनूर कालकुंद्री मार्गानजीक अरायंत्र चालवतात. गेल्या काही वर्षात त्यांनी याच कारखान्यालगत तेल गिरणी व ‘फॅब्रिकेटर्स’चा मोठा व्यवसाय सुरू केला होता. या आगीने सुतार कुटुंबियांनी दोन पिढ्या घाम गाळून कमावलेली संपत्ती क्षणार्धात बेचिराख झाली. लाकूड व तेल साठ्यामुळे आग अधिकच भडकली. गडहिंग्लज नगर परिषदेचा अग्निशमक बंब येईपर्यंत तिन्ही कारखाने जळून बेचिराख झाले.
यावेळी ग्रामस्थांनीही जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आत ठेवलेल्या गॅस सिलेंडरच्या भीतीने यावरही मर्यादा आल्या. आगीत तिन्ही कारखान्यांची मशिनरी, विद्युत मीटरसह मोठा लाकूड साठा, तेल काढण्यासाठी आणलेल्या शेंगा व काढलेले तेल फॅब्रिकेटर्स व्यवसायासाठी आणलेल्या लोखंड, ट्रॅक्टर ट्रॉली आगीत जळून खाक झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळपासून घटनास्थळी परिसरातील हजारो लोकांनी गर्दी केली होती. माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील तसेच अन्य राजकीय व्यक्तींनी भेट देऊन पाहणी केली. आगीचे कारण शोधून काढण्याचे संबंधित यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे.