इंदूर : देशभरात आज रामनवमीचा उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील इंदूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दुर्घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. तर अरुंद रस्त्यांमुळे मदतकार्य करण्यात अडचणी येत आहेत.
मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि ऍम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या नव्हत्या. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्यासह सर्व एमआयसी सदस्य बैठक सोडून अपघातस्थळी निघाले. यासोबतच अनेक राजकारणीही पोहोचले आहे. मदतकार्यासाठी डायव्हर्सना पाचारण करण्यात आलं आहे.