कोल्हापूर : कोल्हापुरातील दूधगंगा नदीजवळ 4 कवट्या सापडल्या आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा येथे दुधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी येत असतात. आज नियमाप्रमाणे पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्याने मानवी व्यक्तीचा फक्त डोक्याचा भाग (कवटी) दिसुन आली. या कवटीवर मांसाचा कोणताही भाग शिल्लक दिसत नव्हता. त्यांनी ताबडतोब सिद्धनेर्लीचे पोलीस पाटील उध्दव पोतदार यांना माहिती देवुन पोलीस स्टेशनला कळविणेबाबत सांगितले. कागल पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळताच त्यांनी सदर मानवी कवटी ताब्यात घेतली आहे. त्यानंतर त्याच परिसरात आणखी तीन कवट्या आढळुन आल्याचे समजताच कागल पोलीस स्टेशनचे आधिकारी घटनास्थळी पुन्हा रवाना झाले व उर्वरित कवट्याही ताब्यात घेण्यात आल्या.
या मानवी कवट्यांवर कोणत्याही प्रकारे मांस नसल्याने ह्या किती दिवसांपूर्वीच्या आहेत, हे सांगता येत नाही. या कवट्या येथे आल्या कश्या, एकाच वेळी चार कवट्या एकाच ठिकाणी सापडल्या असल्याने मोठे गूढ निर्माण झाले आहे.
अशा प्रकारच्या मानवी कवट्या सापडल्याने परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नेमका काय प्रकार आहे, हे अद्याप समजले नसल्याने याबाबत गूढ वाढले आहे. सध्या कागल पोलिसानी या कवट्या ताब्यात घेत अधिक तपास चालू केला आहे.