तेऊरवाडी (एस के पाटील) : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामध्ये अजित पवारांसोबत चंदगड विधानसभा मतदार संघाचे
राष्ट्रवादीचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी पाठींबा दर्शवला आहे. गेल्या काही दिवसापासून चंदगडचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी अजित पवारांना पाठींबा दिला असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. तर आपल्या वाढदिवसादिवशी आमदार राजेश पाटील यांनी अजित पवाराना मुख्यमंत्री केल्याशिवाय वाढदिवस साजरा करणार नाही अशी शपथ घेतली होती. १५ दिवसातच अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने या शपथेची चर्चा मतदारसंघात जोरात चालू आहे.
राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या बरोबरच आमदार राजेश पाटील सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.
आमदार राजेश पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले,
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमच्या हृदयात आहेत. त्यांची तुलना कोणाशीच करता येणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघाचा प्रचंड वेगाने विकास झाला होता त्यानंतर सत्ता बदल झाली आणि विकासाला ब्रेक बसला. पुन्हा राज्यात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने चंदगडचा निश्चित विकास होईल. रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. चंदगड मतदार संघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवार व हसन मुश्रीफ यानाच साथ देतील असा विश्वासही आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला.
एकंदरीत आमदार राजेश पाटील कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिध्द असले तरी त्यांची सध्याची भूमिका पुन्हा मतदार संघाचा विकास कायापालट ठरणार का? हे पहाणे महत्चाचे ठरणार आहे.