कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी तर इतरत्र धुवाँधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यासह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सकाळी 7 ला पंचगंगेची पातळी 21.9 तर रात्री आठला 27.7 फुटापर्यंत होती. रात्री पावणे अकरा वाजता पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले. बारा तासात सुमारे सहा फुटाने पातळी वाढली. पंचगंगा पात्रातून पुढे जाणारा विसर्ग 286.14 क्युसेक आहे. नदीची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने 1200 क्युसेक विसर्ग आहे.
दरम्यान, पूल पाण्याखाली गेल्यामुळे बर्की धबधबा आणि ओढ्यावर पाणी आल्याने रांगणा किल्ला पर्यटकांसाठी बंद केला आहे. ट्रेकसाठी रांगणा किल्ला येथे गेलेल्या पण ओढ्यावर पाणी आल्यामुळे अडकून पडलेल्या 17 जणांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, महसूल अधिकारी व ग्रामस्थांनी सुखरुप बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून दमदार पावसाने जोर धरला होता. पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे ओढे, नाल्यांसह ओहळ दूथडी वाहत आहे. परिणामी जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे विविध पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 122 प्रमुख जिल्हा व 24 राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा व दोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने बंद झाले आहेत. तेथे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. गेल्या अनेक दिवसपासून अपेक्षित असलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. गेल्या तीन दिवसांत 16 ते 18 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. आतापर्यंत 85 ते 87 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.