चंदगड : मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून किटवाड येथील दोन्ही धरणांसह तेथील धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू झाला की किटवाड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील दोन्ही धरणे भरून ती ओव्हर फ्लो कालव्यातून वाहू लागते. त्या दोन्ही धरणावर नैसर्गिकरित्या तयार झालेले धबधबे हे पावसाळ्यामध्ये कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरत असतात. शेतीसाठी हि दोन्ही धरणे आजूबाजूच्या गावाकरिता महत्वपूर्ण आहेत.
या धरणाच्या ठिकाणी असलेले धबधबे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले नसले तरी पावसाळ्यात ही धरण व धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. किटवाड धरण व धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून केले जाणारे नशापाणी, हुल्लडबाजी, शिवीगाळ, नको तिथं सेल्फी काढणे यातून खूप दुःखद घटना घडल्या आहेत. यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर किटवाड धरण आणि धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
या वर्षी पाऊस खूप उशिरा चालू झाल्यामुळे किटवाडची दोन्ही धरणे अजून भरलेली नाहीत. तथापी गोव्यासह कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातून पर्यटक किटवाडकडे येत आहेत. या आठवड्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या आपले पात्र सोडत आहेत.
सगळीकडे पुराची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेवून चंदगड तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शासनाकडून पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.