बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत, पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा खाते बेळगाव आणि जिल्हा प्राणी दया संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी विविध उपक्रमांनी ‘जागतिक रॅबीज दिन’ साजरा करण्यात आला.
हॉटेल सन्मान समोरील पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये आयोजित या जागतिक रॅबीज दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ उपस्थित होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांसह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात आमदार सेठ यांनी रॅबीज प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व विशद करून समयोचित विचार व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत एका श्वानाला रॅबीज प्रतिबंधक लस टोचण्याद्वारे लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे पशु कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संघटनांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या खेरीज निःश्वार्थ प्राणी सेवा करणाऱ्या पशु कल्याण संघटना आणि व्यक्तींना प्रथमोपचार वैद्यकीय किटचे मोफत वाटप करण्यात आले.
जागतिक रॅबीज दिनाचे औचित्य साधून यावेळी पेट शॉप अर्थात पाळीव प्राण्यांच्या दुकान चालकांना तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. रॅबीज मार्गदर्शन सत्रात तज्ञांनी उपस्थितांना कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रॅबीज या आजाराबद्दल तसेच वेळीच दक्षता व उपचार न घेतल्यास तो कसा जीवघेणा ठरू शकतो याची माहिती दिली. यासाठी प्रत्येक कुत्र्यांचे रॅबिज प्रतिबंधक लसीकरण अत्यावश्यक असल्याचे सांगून त्यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमास प्राणी दया संघ व पशु कल्याण संघटनांचे पदाधिकारी सदस्य, पाळीव कुत्र्यांचे मालक, पेट शॉप चालक व पशुप्रेमी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आनंद पाटील यांच्यासह पशुवैद्यकीय सेवा खात्याच्या अन्य डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.