महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे निवेदन
निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्न प्रलंबित असल्याने कर्नाटक सीमाभागातील शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मोठे नुकसान होत हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून लवकरच सीमा भागातील मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास आहे. या प्रश्नाबाबत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागण्याबाबत चर्चा करणार आहे. यापूर्वीही या प्रश्नाबाबत चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न झाला होता. सीमाप्रश्न सुटला तर संपूर्ण सीमावासियांना जन्माचे सार्थक होणार असून सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले. निपाणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती विभागातर्फे करवीर तालुक्यातील कांडगाव येथे आमदार निलेश लंके आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती अजित कारंडे यांची कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. त्याप्रसंगी आमदार लंके बोलत होते.
आमदार लंके म्हणाले, अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र सीमा भागातील मराठी भाषेच्या पाठीशी आहे. आपल्याकडूनही सर्वतोपरी मदत करणार आहे. सीमाप्रश्नासाठी मी स्वतः तुमच्या सोबत यायला तयार आहे. पण हे आंदोलन हाती घेतले तर प्रश्न सुटेपर्यंत लढण्याची तयारी ठेवावी. याबाबत सीमा भागात व्यापक बैठक आयोजित केल्यास मार्गदर्शनासाठी जरूर येऊ.
अजित कारंडे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना सोबत रायरेश्वरावर शपथ घेऊन स्वराज्य उभे केले. तुम्ही तर त्यांचे वारसदार आहात, याची आठवण ठेवून युवकांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
यावेळी निपाणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी अध्यक्ष बंडा पाटील, कार्याध्यक्ष अजित पाटील, मीडिया प्रमुख नेताजी पाटील, आनंदा रणदिवे, दीपक पाटील, हिंदुराव पाटील, गणेश माळी, शिवाजी पाटील यांच्यासह निपाणी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.