बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आवाहन
बेळगाव : मराठी सीमाभाग अन्यायाने १ नोव्हेंबर १९५६ रोजी तात्कालीन म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे गेल्या ६७ वर्षापासून आपण काळा दिन गांभीर्याने हा काळा दिन सुतक दिन म्हणून पाळत असतो. येत्या एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळा दिनाच्या सायकल फेरीत सीमाभागातील हजारोंच्या संख्येने सीमावासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग होऊन केंद्र सरकारचा निषेध करून हा सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील करावा व ही सायकल फेरी यशस्वी करावी, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील यांनी केले.
रविवार दिनांक २२ रोजी दुपारी मराठा मंदिर येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर ऍड. एम. जी. पाटील म्हणाले की, सीमावासीय गेल्या 67 वर्षापासून सातत्याने काळादिन मोठ्या गांभीर्याने पाळतात. या काळात दिनाच्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी होत असतात व येणाऱ्या काळा दिनाच्या फेरीमध्ये ही मोठ्या संख्येने सहभागी होतील व आपला निषेध केंद्र सरकारला दाखवून देथील. केंद्र सरकारने याची दखल घेऊन हा सीमाभाग मराठी भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांच्या मायबोली महाराष्ट्राच्या राज्यात साहित्य करावा. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आर. के. पाटील, शिवाजी खांडेकर, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी, मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील, शिवाजी सुंठकर आदींनी आपले विचार व्यक्त केले.
सदर बैठकीत कांही ठराव करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने तालुका समितीची कार्यकारी लवकरच जाहीर करण्यात यावी यासाठी उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील यांना सर्वाधिकार देण्यात यावे या ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
यावेळी ऍड. राजाभाऊ पाटील, ऍड. एम. जी. पाटील, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, शिवाजी सुंठकर, सुनील अष्टेकर, पुंडलिक पावशे, मनोहर संताजी, आर. के. पाटील, लक्ष्मण होनगेकर, नारायण सांगावकर, ऍड. प्रसाद सडेकर, महादेव बिर्जे, बि. डी. मोहनगेकर, रावजी पाटील, निलेश शिंदे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.