हुबळी : कर्नाटक राज्यात 50 लाखाहून अधिक मराठा समाज बांधव आहेत. समाज बांधवांच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने 26 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बनवासी येथे अखिल कर्नाटक मराठा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने सरकारकडे मागण्या मांडल्या जाणार आहेत, अशी माहिती कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा फेडरेशनचे अध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांनी हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, संपूर्ण कर्नाटक राज्यात मराठा समाज विखुरलेला आहे. या समाजाला एकत्र करून समाज हिताच्या दृष्टीने फेडरेशनच्या वतीने कामे केली जात आहेत. कर्नाटक राज्यातील राजकीय पक्षांना मराठा समाजाची ताकदीतीची जाणीव आहे. मराठा समाजाचा राजकीय पक्ष उपयोगही करून घेतात. मात्र त्यामानाने मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने राजकीय पक्ष सत्तेवर असताना काम करीत नाहीत. याची गंभीर दखल घेऊन 26 रोजीच्या मेळाव्यात विविध मागण्या मांडल्या जाणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने राज्यातील किमान सहा जागांवर मराठा समाजाला उमेदवारी द्यावी, अशी प्रमुख मागणी केली जाणार आहे. बेळगाव, चिकोडी, धारवाड, उत्तर कन्नडा कारवार जिल्हा, बिदर, बागलकोट या ठिकाणी मराठा समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात मराठा समाजालाच उमेदवारी देण्यात यावी. यासाठी काँग्रेस आणि भाजपकडे मागणी केली जाणार आहे.
भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाचा चांगलाच उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे या पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास, भाजपला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला जाईल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे. यावेळी मोहन जाधव (बागलकोट), उपाध्यक्ष जी. एस. चव्हाण (हुबळी), मंगला काशिलकर (हल्ल्याळ), सुमित्रा उगळे (चिकोडी), जी. डी. घोरपडे (धारवाड) व अन्य मान्यवर उपस्थित होते.