Friday , April 17 2026
Breaking News

द्वेषपूर्ण वक्तव्य प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

Spread the love

 

अटक करण्याची मागणी

निपाणी (वार्ता) : सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा गुन्हा नोंदवा. असा तक्रार अर्ज अभिनंदन भोसले यांनी निपाणी पोलीस ठाण्यात मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांना दिला.
तक्रार अर्जातील माहिती अशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ‘सनातन धर्म, म्हणजे देशाला लागलेली कीड आहे’, असे वक्तव्य केले आहे. कोणत्याही धर्माविषयी अशोभनीय, निंदा करणारे, अपमानास्पद वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावणे हा भा.दं. संहिता कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ), 298, 505 आणि आय.टी. कायदा यांतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्यांना त्वरित अटक करण्यात यावी. चेन्नई येथील कामराज मैदानात भारतीय ‘मुक्ती संग्रामातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान’ या विषयावरील व्यंगचित्रांच्या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘काही गोष्टींना नुसता विरोध करून जमणार नाही, तर त्यांचा समूळ नायनाट केला पाहिजे. डेंग्यूचे डास, मलेरिया, कोरोना, ताप यांसारख्या गोष्टींना केवळ विरोध करून जमत नाही. त्यांना नष्ट केले पाहिजे. त्याप्रमाणे सनातन (धर्म) सुद्धा नष्ट केला गेला पाहिजे. ‘हेट स्पीच’ विषयी सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती के. एम्. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी 28 एप्रिल या दिवशी ‘समाजात कुणीही द्वेष पसरवणारे वक्तव्य करून समाजात वाद निर्माण करणार्यांच्या विरोधात कुणी तक्रार प्रविष्ट करण्याची वाट न पहाता सरकारने स्वत:च गुन्हा नोंदवावा’, असे निर्देश दिले आहेत. असे करण्यास विलंब झाला, तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असे असूनही सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण भाषण करणार्यांच्या विरोधात अद्यापही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजेश आवटे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अजित पारळे, धर्मप्रेमी शेखर पुणेकर, शंकर पाटील, प्रवीण सूर्यवंशी, साईनाथ खोत, मल्लिकाजुर्नन जोडगे, हिंदु जनजागृती समितीचे अनिल बुडके, योगेश चौगुले उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *