बेळगाव : आम्ही बेळगावातील गुन्ह्यांची संख्या गांभीर्याने घेतली असून, मागील गुन्ह्यांच्या तुलनेत सध्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले.
बेळगाव शहरात आज पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री परमेश्वर म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात महामार्ग आणि इतर रस्त्यांवर होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे, बेळगाव परिसरात जमीन, मालमत्ता वादातून होणाऱ्या खुनाच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे, मी त्यांची तपासणी केली आहे. त्याचप्रमाणे राज्यात शासनाच्या आदेशानुसार 15 वर्षांवरील 1700 वाहने शोधून काढली आहेत. बेळगाव पोलीस आयुक्तालयाने मागितलेला निधी, पोलीस खात्यासाठी आवश्यक त्या सुविधा आम्ही दिल्या आहेत, समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही काम करू. संपूर्ण बेळगावात सुवर्णसौध बांधल्यानंतर अधिवेशन काळात होणारी आंदोलने शक्य तितकी कमी करण्याच्या सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागाला दिल्या आहेत. शेतकरी व संघटना आंदोलन करू शकतात. पोलिसांसाठी घरबांधणीचे काम सुरू आहे. त्यासाठी आम्ही 5 कोटी रुपये जारी केले आहेत. पूर्वी आलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून सूचना दिल्या आहेत. तपासाविना पडून राहिलेल्या 500 केसीस पाहिल्या आहेत. त्यांना कोणी हात लावलेला नाही. त्याबाबत विचार केला जाईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले. केएसएआरपी प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबल आणि सिव्हिल ट्रेनिंग घेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना योग्य ठिकाणी काम करण्याचे निर्देश दिले जातील. कोणत्या भागासाठी डीवायएसपी आणि सीपीआय आवश्यक आहेत, जिथे कर्मचाऱ्यांची कमतरता असेल, तेथे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करू. ते म्हणाले की, आंतरजिल्हा बदल्यांमध्ये पोलिसांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांची वरचेवर बदली केली जाते. गुन्ह्यांची संख्या 300वर पोहोचल्यास तेथे नवीन पोलिस ठाणे देण्याचा कायदा आहे असे परमेश्वर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार राजू सेठ, शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.