गुंजी : विद्यार्थ्याकडून मिळालेले प्रेम आणि त्यांनी केलेला आदर सत्कार हा आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अनमोल असा ठेवा आहे. आपले विद्यार्थी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले पाहताना अभिमानाने उर भरून येतो. विद्यार्थ्यांना पालकांबरोबर शिक्षकांच्याही शुभेच्छा नेहमीच पाठीशी असतात, हे लक्षात ठेवून सत्याच्या मार्गावरून ध्येयाचा वेध घेत पुढे जावे. सत्कार्याने सर्वांचे नाव उज्वल करताना विद्यार्थ्यांनी परस्परांशी आणि आपल्या शाळेची सलोखा, स्नेह व आपलेपणातून घनिष्ठ ऋणानुबंध तयार केल्यास, तेच निर्भेळ-निर्भिड व विश्वासाचे नाते मानवी जीवनाचे खरे औषध ठरू शकते यात शंका नाही, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षक श्री. ए. एन. देसाई यांनी व्यक्त केले, ते सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा गुंजी येथील सन 1984-85 सालाच्या इयत्ता सातवीच्या बॅचने आयोजित “माजी विद्यार्थी स्नेह-मेळाव्यात” बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक श्री. बी. बी. बेडका होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुलींच्या सुरेल स्वागत गीताने आणि वृक्षाला जलार्पण करण्यातून झाली. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. सोनापा दाजीबा गोरल यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. श्री. देसाई पुढे म्हणाले, नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं, तेच खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचा असतोच असं नाही, तर हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
येथील प्राथमिक शाळेच्या 1984-85 सालाच्या इयत्ता सातवीच्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा तब्बल 38 वर्षानंतर झाला. सर्व माजी वर्गमित्र मैत्रिणीसह शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. वेगवेगळ्या व्यवसाय, उद्योग, नोकरी आणि इतर कामानिमित्त विखुरलेले मित्र आपल्या दुरच्या ठिकाणाहून स्नेह मेळावा निमित्त एकत्र आले. यावेळी गुरुवंदनाच्या रूपात सर्व निवृत्त शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या बॅचने कृतज्ञता व्यक्त करताना आपल्या शाळेच्या गरजेनुसार सात ग्रीन फलक भेट दिली. शिवाय कोरोना महामारीत व त्यानंतर मरण पावलेल्या दहा वर्ग मित्रांच्या कुटुंबियांना स्मृती प्रित्यर्थ निधीची वाटप करण्यात आले. यावेळी श्री. मोनेश्री परशराम गोरल यांनी हि बॅच कायम लक्षात राहील अशीच आहे असे सांगून आपल्या गत स्मृतिना उजाळा दिला. तर ऍड. सुधीर गावडे यांनी या बॅचमधील सर्व ग्रामीण विद्यार्थी केवळ पुस्तकी किडा नव्हते, तर विविध क्षेत्रात तरबेज होते, त्यांची संघभावना नेहमीच लक्षात राहील असे मत व्यक्त केले. यावेळी निवृत्त शिक्षक श्री. एम. पी. पाटील, श्री. वाय. एम. पाटील, श्री. के. के. मडवाळकर, श्री. के. वाय. चोपडे, श्री. जे. बी. पाटील, श्रीमती हेल्डा परेरा, श्री. वाय. आर. पाटील, श्री. एम. एम. पाटील, शाळा सुधारणा कमिटी चेअरमन श्री. तानाजी गोरल, ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. संतोष गुरव, पत्रकार श्री. रावजी बिर्जे, यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह आठवणीसाठी मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रत्येकाने आपल्या करिअरचा धावता आढावा व्यक्त करत या सोहळ्यात भारावून गेले.
या कार्यक्रमाची सुरेख नियोजन श्री मोनेश्री गोरल, ऍड. सुधीर गावडे, रायमण मस्करेन, डॉ. एस. डी. गोरल, श्री. गणपती गावडा, आशिष मनोज, मल्हारी पाटील, अशोक पाटील, रामलिंग पाटील, फुलामेन दालमेत, प्रमोद देसाई, राजाराम नावगेकर, निकला सोज, बडकू चव्हाण, गजानन पवार यांनी केले. हा योगायोग जुळून आणल्याबद्दल उपस्थित सर्व वर्ग मित्रांनी आभार व्यक्त केले. एकंदरीत हा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले तर आभार श्री. दत्ता राऊत यांनी मानले.