माजी आमदार काकासाहेब पाटील : गृहमंत्री जी. परमेश्वर यांची घेतली भेट
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला यापूर्वीच तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. शहरात तालुका पातळीवरील अनेक कार्यालय असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. याशिवाय शहर आणि उपनगराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणारे हे प्रमुख शहर आहे. त्यामुळे निपाणी शहरात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन स्वतंत्ररित्या शहरासाठी वाहतूक पोलिस कार्यालय निर्माण करावे, अशा मागणीचे पत्र माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी गृहमंत्री जी. परमेश्वर यांची सुवर्णसौध येथे भेट घेऊन दिले.
निपाणीत उपनगराची संख्या वाढत आहे. निपाणीलगत कागल, गडहिंग्लज, हक्केरी, चिकोडी, मुरगूडसह ५० गावातील नागरिकांचा शहराशी दररोजचा सपंर्क असतो. सध्या परिसरासह बाहेर गावाहून शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. निपाणीची कापड बाजारपेठही प्रसिद्ध आहे. पोलिस सर्कलमध्ये मनुष्यबळ मुळातच कमी आहे. असलेल्या कर्मचाऱ्यांवर वाहतूक सुरळीत करण्याचे काम करावे लागत आहे. सण, समारंभ, आंदोलन, मोर्चे यासह ग्रामीण भागातील यात्रा-जत्रावर बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाला सज्ज रहावे लागते. सदर बाब लक्षातघेऊन स्वतंत्र ट्रॅफिक पोलिस ठाण्याची निर्मिती करावी. स्वतंत्र रहदारी पोलिस ठाण्यास स्वतंत्ररित्या मंडळ पोलीस निरीक्षक आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नवनाथ चव्हाण, प्रशांत हंडोरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.