बेळगाव : चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी धर्म आणि मानवतावादी तत्वांदरम्यान सुसंवाद एकोपा आवश्यक असल्याचे मत राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी व्यक्त केले.
शहरातील सिद्धसेन रिसर्च फाउंडेशन येथे आज मंगळवारी आयोजित 1008 व्या भगवान श्री महावीर यांचा 2550 व्या निर्वाण महोत्सव, पूज्य आचार्यनाथ श्री 108 बाहुबली मुनी महाराज यांची 92 वी जयंती आणि 25 वा दीक्षा महोत्सव अशा संयुक्त सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने राज्यपाल बोलत होते. आपल्या भाषणात राज्यपाल गहलोत यांनी जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर असलेल्या महावीर स्वामीजींचा अहिंसेचे प्रतीक असा उल्लेख करताना त्यांच्या त्याग आणि तपश्चर्येचा गौरव केला. तसेच श्री महावीर स्वामीजींच्या ‘जगा आणि जगू द्या’ या अमर संदेशाची प्रशंसा केली. आपण जितके कमवतो त्यातील काही भाग अंशतः का होईना गरिबांच्या हितासाठी खर्च करावेत तरच आपण महावीर स्वामीजींच्या सिद्धांतानुसार चालत आहोत असे म्हणता येईल. मला विश्वास आहे की अशा प्रवचनांच्या माध्यमातून आपण तसे कराल. समाजसेवा मानव सेवेबरोबरच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक, परमार्थिक अशा अनेक कार्यांद्वारे जैन धर्म संपूर्ण देशात महावीर स्वामीजींनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. आपण देखील तशा पद्धतीचे जीवन जगून मोक्ष प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन राज्यपालांनी उपस्थितांना केले.
संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे आणि सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक व चिकित्सा यासारख्या विभिन्न क्षेत्रात विकास करत असलेल्या जैन समुदायाच्या परमपूज्य बालाचार्य श्री 108 सिद्धसेनजी गुरुजींना दीक्षा प्राप्त 25 वर्षे झाली. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देणे त्यांचे अभिनंदन करणे योग्य नाही कारण ते संत आहेत. मात्र तरीही राज्यपाल या नात्याने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वराकडे प्रार्थना करतो की ते दीर्घायुष्य होवोत. तसेच तंदुरुस्त राहून त्यांनी जनसेवा आणि देशसेवेचे कार्यात अग्रणी रहावे. गेल्या 25 वर्षात त्यांच्याकडून अनेक तीर्थस्थळांचा जीर्णोद्धार केला गेला. अनेक मंदिरांची निर्मिती करण्यात आली. तसेच अनेक पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवांचे यशस्वी आयोजन केले गेले.
श्री सिद्धसेन महाराजांनी 2016 -17 मध्ये अध्यात्मिक अनुसंधान फाउंडेशनची स्थापना करून एका ट्रस्टच्या माध्यमातून बेळगाव शहरानजीकच्या हालगा गावात मुनी निवासाची निर्मिती केली आहे. आगामी दिवसांमध्ये विशाल मंदिर बांधण्याचे गुरुदेवांचे ध्येय आहे असे राज्यपाल थावरचंद गहलोत आपल्या भाषणात म्हणाले.
सदर सोहळ्यास 108 वे श्री सिद्ध सेना मुनी महाराज, अहिंसा विश्व भारतीय श्री आचार्य लोकेश मुनी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सोहळ्यास निमंत्रितांसह जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.