बेळगाव : सौंदत्ती यल्लमा डोंगर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, राज्याचे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी केले. काल शनिवारी यल्लमा डोंगरावर मंत्री एच. के. पाटील यांनी भेट देऊन तेथे चाललेल्या विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शुक्रवारी पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यल्लम्मा डोंगर विकासासंदर्भात विधेयकाला मंजुरी ही मिळाली आहे. लवकरच श्री रेणुका मंदिर विकास समिती स्थापन करण्यात येणार आहे.
श्री रेणुका देवी यात्रेला मोठ्या संख्येने भाव येत असतात. याकडे लक्ष देऊन महिलांसाठी तात्पुरते शेड बांधण्यात येणार आहेत. या जत्रेसाठी बहुसंख्य भाविक बैलगाडी घेऊन येतात. त्यामुळे पशुदासोह उभारून जनावरांसाठीही चाऱ्याची व्यवस्था केली जाईल असे त्यांनी सांगितले. भाविकांच्या सोयीसाठी यल्लमा देवस्थानाला रेल्वे कनेक्शनची व्यवस्था केली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी सौंदतीचे आमदार विश्वास वैद्य, सीईओ एस पी बी महेश. सीपीआय धर्मांतर धर्मटी, अभियंता एम. बी. मुळूर रामनगौडा तिप्पराशी यांनी मंत्र्यांचा शाल, श्रीफळ आणि रेणुका देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला.यावेळी मंदिराचे सह कार्यनिर्वाहक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.