बेळगाव : शाळा-कॉलेजची मुले, ज्येष्ठांसाठी जादा बसेस सोडण्याची मागणी करत भारतीय महिला महासंघातर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी स्त्रीशक्ती योजनेंतर्गत राज्यभरात मोफत बसप्रवासाची योजना सुरु केली ही चांगली बाब आहे. मात्र यामुळे मुलांना शाळा-कॉलेजच्या वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने त्यांची तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जादा बसेस सोडण्याची मागणी करत भारतीय महिला महासंघातर्फे बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनच्या पदाधिकारी उमा माने यांनी सांगितले की, महिलांसाठी मोफत बस योजना सरकारने सुरु केली हि चांगली बाब असली तरी त्यामुळे बसेस गर्दीने भरून जात आहेत. त्यामुळे शाळा-कॉलेजच्या वेळेत मुलांना, नोकरदारांना बस मिळत नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना उभे रहायला सुद्धा जागा नसल्याने त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अतिरिक्त बसेस सोडाव्यात अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, यावेळी सरकारच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनच्या जिल्हाध्यक्षा कला सातेरी, कला कार्लेकर, मीरा मादार, ऍड. नागेश सातेरी, अनिल आजगावकर तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.