चिकोडी : चिकोडी तालुक्यातील ननदीवाडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री सदाशिव श्रीपती वंजीरे व ओंकार वंजीरे यांनी आपल्या 18 गुंठे जमिनीमध्ये सहा महिन्यात तब्बल 10 टन इतके वांग्याचे विक्रमी उत्पादन घेतले.
यावेळी बोलताना सदाशिव वंजीरे म्हणाले, वांग्याच्या झाडाची उंची सरासरी सहा ते सात फूट इतकी आहे. सध्या वांग्याच्या बागेमध्ये अजून भरपूर वांग्याचे पिक दिसत असून अजून पुढील काळात सहा ते सात टन इतके वांग्याचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. या पिकांमधून आजपर्यंत अठरा गुंठ्यात कमी दरामध्ये अडीच ते तीन लाख इतका नफा मिळाला असून अजून कमीत कमी दीड ते दोन लाख इतका नफा मिळण्याची शक्यता आहे. ही वांग्याची लागण 18 गुंठ्यामध्ये श्रीराम कंपनीचे ठिबक सिंचनचा वापर करून व मल्चिंग पेपर अंथरुण 26 जून 2023 रोजी मायको 1093 जातीच्या वांग्याच्या रोपाची लागवड करण्यात आली असून सहा फूट बाय अडीच फूट अंतरावर वांग्याचे रोप लागण करण्यात आली आहे. लागणीनंतर 45 ते 55 दिवसानंतर झाडांना फुलकळी व वांग्याचे उत्पादन सुरू झाले. या विक्रमी उत्पादनास पिंटू मगदूम यांचा सल्ला व मार्गदर्शन लाभले असल्याचे सदाशिव वंजारे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ननदीवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या मागे न लागता भाजीपाला व फळबाग याकडे वळावे तसेच शासनाच्या अनुदानातून ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन कमी पाण्यात व कमी जमिनीमध्ये जास्त उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.