बेळगाव : बेळगावात गेल्या काही दिवसांपासून कन्नड नामफलकांची सक्ती करून व्यापाऱ्यांना, मराठी भाषिकांना वेठीस धरणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर येत्या २५ जानेवारीच्या आत कठोर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
बेळगावसह राज्यात दुकाने, व्यापारी आस्थापनांवर कन्नड भाषेतील फलक लावण्याची मागणी करत काही कन्नड संघटनांनी वळवळ सुरु केली आहे. कन्नड व्यतिरिक्त अन्य भाषेतील नामफलकांची नासधूस करणे, व्यापाऱ्यांना त्यासाठी दादागिरी करून वेठीस धरणे असे प्रकार सुरु आहेत. पोलिसांसमक्ष ही दादागिरी करण्यात येत आहे. अधिकारी व पोलीस त्यांच्यावर कारवाई न करता बोटचेपेपणाचे धोरण अवलंबत आहे. त्यातच सरकारदेखील कायद्याद्वारे कन्नड नामफलकांची सक्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या निषेधार्थ रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार करून महाराष्ट्र एकीकरण समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शने करून निवेदन केले.
यावेळी म. ए. समिती नेते व कार्यकर्त्यांनी, बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, घटनाविरोधी कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. निदर्शनानंतर कन्नडसक्तीच्या विरोधात तसेच सक्ती करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना मनोहर किणेकर यांनी, एखादा भूभाग वादग्रस्त असताना कोणत्याही कायद्याची सक्ती करता येत नाही. तरीही कर्नाटक सरकार वादग्रस्त सीमाभागात कन्नडसक्तीचा कायदा लागू करून घटनाविरोधी कृत्य करत आहे, त्यामुळे कन्नडसक्ती मागे घ्यावी तसेच कन्नड नामफलकांसाठी दादागिरी करून सक्ती करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समिती या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देईल, त्याच्या परिणामांना कर्नाटक सरकार व कन्नड संघटनाच जबाबदार असतील असा इशारा दिला.
यासंदर्भात बोलताना म. ए. समिती नेते रमाकांत कोंडूसकर म्हणाले की, गेले कित्येक दिवस बेळगाव व परिसरात कन्नडमध्ये बोर्ड लावण्यासाठी कन्नड गुंड दादागिरी करत आहेत. मराठी व अन्य भाषेतील बोर्डची नासधूस करून नुकसान करत आहेत. आमच्या मराठी भाषेवर, संस्कृतीवर गंडांतर आणू पाहणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. ८ ते १० दिवसांत त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास आम्ही भव्य आंदोलन छेडू, त्याच्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी माजी महापौर व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, मनोज पावशे, मदन बामणे, विकास कलघटगी, आर. आय. पाटील, सतिश पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, रामचंद्र मोदगेकर, शिवानी पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, प्रकाश चव्हाण यांच्यासह बेळगाव शहर व तालुका तसेच खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.