प्रा. विष्णू पाटील; कागल न्यायालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’
निपाणी (वार्ता) : भाषा हे संवाद आणि अभिव्यक्तीचे साधन आहे. राज्याला वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभला आहे. समाजात संस्कृती टिकण्यासाठी भाषेची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. असे मत प्रा. विष्णू पाटील यांनी व्यक्त केले. कागल येथील न्यायालयात आयोजित मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी
बी. जी. गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, सह न्यायाधीश अमोल जवळे, बार कौन्सिलचे अध्यक्ष ए. जे. देसाई, अभिजीत साळगावकर, प्रा. नामदेव मधाळे उपस्थित होते.
प्रा. पाटील म्हणाले, मराठी राज्यकर्त्यांनी दिल्ली ते तंजावर पर्यंत साम्राज्य विस्तार केला. साहजिकच मराठी भाषेचा विस्तार झाला. स्वतंत्र भारतात भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले आणि मराठीला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली. एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असणारी मराठी भाषा आजच्या काळात मराठी माणसाच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित होत आहे. अशावेळी मराठीचे राजवैभव पुन्हा एकदा मराठी माणसांनी मनागनात जपून ती जनाजनात रुजवणे आवश्यक आहे. यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम प्रेरणादायी ठरेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा आहे. श्रवणबेळगोळ येथील शिलालेख चामुण्डराजे करविले, गंगराजे सुत्ताले करवियले हा मराठी भाषेचा विस्तार दर्शविणारा आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या निरूपणाने सामान्य माणसाला भक्ती मार्ग सुलभ केला. संत नामदेव, निवृत्तीनाथ, एकनाथ, तुकाराम, गौरा कुंभार सावता माळी, जनाबाई मुक्ताबाई, कान्होपात्रा आदी संतानी मराठी वाङ्गयाचे दालन समृद्ध केल्याचे सांगितले. कार्यक्रमास तालुका विधी व न्याय सेवा समिती अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.