निपाणी (वार्ता) : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात शांततेने अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा सपाटा लावला होता. त्यामुळे मोर्चे, आंदोलन आणि उपोषणामुळे महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावी लागली. अखेर शासनाने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे निपाणी भाग मराठा समाजातर्फे येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
प्रारंभी विनोद साळुंखे यांच्या हस्ते बसस्थानक चौकातील धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठा समाजाच्या दृष्टीने आरक्षण मिळणे, ही खुप मोठी गोष्ट आहे. पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी हा लढा होता. मनोज जरांगे -पाटील यांनी ते करून दाखवले. या आंदोलनामध्ये कर्नाटक सीमा भागातील मराठा समाज बांधवांनी ही सहभाग घेतला होता.
यावेळी माजी सभापती विश्वास पाटील, नवनाथ चव्हाण, अरुण आवळेकर, सुधाकर सोनारकर, झुंजार दबडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण,माजी नगरसेवक संदीप चावरेकर, अशोक खांडेकर, शिवम जासूद, विष्णू कडाकणे, सुधीर माळवे, दादासाहेब खोत, सुनील हिरुगडे, विनोद बल्लारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.