डॉ. शंकर पाटील; ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यान
निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्यानंतर शासनाने हाती घेतलेल्या हरितक्रांती कार्यक्रमामुळे शेतीतील उत्पादन वाढले. पण परराष्ट्रीय कंपन्यांनी रासायनिक खते व बियाण्यांची विक्री मोठ्या
प्रमाणात व्हावी, म्हणून प्रचार, प्रसार केला. साहजिकच शेतकऱ्यांनी वाढीव उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अमाप वापर केला. संकरित बियाण्यांमुळे शेतक-यांचे पारंपारिक बियाणे कमी झाले. त्यामुळे शेतकरी परावलंबी झाला. रासायनिक खते, किटकनाशकांचा अति वापरामुळे जमिनीचा दर्जा खालावला आहे, असे मत डॉ. शंकर पाटील यांनी व्यक्त केली.
अर्जुननगर (ता. कागल) येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे आयोजित ‘बदलती जीवनशैली व आरोग्य’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. पाटील म्हणाले, भाजीपाला, धान्यामध्ये देखील रासायनिक खते व किटकनाशकांचा अंश असल्याने कॅन्सर, मधुमेह, किडनी विकार यासारख्या गंभीर आजारांना अनेकांना बळी पडावे लागत आहे. सेंद्रिय शेती करेपर्यंत आजारांचे प्रमाण वाढत जाणार आहे. आरोग्यसंपन्न व दिर्घायुषी व्हायचे असेल तर आहार व विहारामध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची डॉ. पाटील यांनी उत्तरे दिली.
संघाचे सचिव अशोक तोडकर यांनी स्वागत केले. संघाचे उपाध्यक्ष दादासो पाटील यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. संघाचे अध्यक्ष रघुनाथराव घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सभासद विलास कांबळे, विजयकुमार चौगुले, नारायण लोहार, श्रीपती चौगुले, चंद्रकांत बडवे, सज्जन ताते, जयसिंग चौगुले, मारुती ठाणेकर, अशोक लोहार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.