Friday , November 22 2024
Breaking News

तेऊरवाडी – कुदनूर परिसरात टस्कराचे आगमन; बेळगावच्या दिशेने प्रवास

Spread the love

 

तेऊरवाडी (एस के पाटील) : एक वर्षानंतर पुन्हा एकदा टस्कर हत्तीने तेऊरवाडी (ता. चंदगड)च्या जंगलातून दुंडगे मार्गे कुदनूर
कालकुंद्री शिवारात आगमन झाल्याने ग्रामस्थांची एकच पळापळ झाली. काल दि. २३ रोजी रात्री तेऊरवाडी -कमलवाडी येथील शेतकऱ्यांना या टस्कर हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर किटवाड धरण परिसरात आज दि. २४ रोजी सकाळी टस्कर हत्तीचे पून्हा दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी ७ वाजता हा हत्ती कालकुंद्रीचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक तुकाराम पाटील यांनी पाहिला. प्रचंड आकार व दीड फूट लांबीचे सुळे असलेला हा टस्कर आहे. सकाळी काही वेळ हत्तीने कुंबरी शेत परिसरातील नरसु रामू तेऊरवाडकर यांच्या उसाच्या फडात विश्रांती घेतली होती. तथापी अतिउत्साही लोकांच्या हुल्लडबाजीमुळे हत्ती बिथरून पुन्हा कुदनूर हद्दीत किटवाड धरण क्र. २ सांडवा परिसरात घुटमळत होता. या घटनेमुळे परिसरातील कालकुंद्री, कुदनूर, किटवाड ग्रामस्थ सतर्क झाले असून दवंडी व स्पीकरवरून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. हत्तीला त्रास देऊ नये अशा प्रकारच्या सूचना वनविभागाकडून दिल्या जात आहेत. गेल्यावर्षी याच दिवसात एकच हत्ती तेऊरवाडी येथील ब्रम्हदेव मंदिर परिसरात येऊन तो अडकूर येथे गेला होता.
आज सकाळी एकच हत्ती दृष्टीस पडला असला तरी काल रात्री चिंचणे परिसरात काही लोकांनी दोन हत्ती पाहिल्याचे म्हटले आहे. यावरून हत्ती तेऊरवाडी, कामेवाडी जंगलातून ताम्रपर्णी नदी पार करून कुदनूर ओढ्याच्या समांतर शिवारातून किटवाड धरण परिसरात आल्याचे स्पष्ट होत आहे. आज पहाटे कुदनूर येथील टोळी ऊस तोडणीसाठी तांदळे काट्याकडे चालली होती. त्यांना हत्ती कुदनूर ओढ्यातून पुढे सरकत कालकुंद्री हद्दीत वारीच्या दिशेने जाताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतरच ऊळीचे टेक येथे हा हत्ती अशोक पाटील यांना दिसला असावा. तथापि यातील एक हत्ती नंतर कुणाला दिसलेला नसला तरी दोन हत्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या परिसरात ऊस तोडणी साठी किमान ४-५ कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत आहेत. स्थानिक व बाहेरून आलेल्या टोळ्यांमध्ये यामुळे घबराटीचे वातावरण असून ऊस तोडणीचे काय करावे या संभ्रमात शेतकरी व तोडणी कामगार आहेत. दरम्यान दुपारी साडेअकरा वाजता कुदनूर किटवाड मार्गानजिक हत्ती आला असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन जमलेल्या जमावाला दुपारी हत्तीची विश्रांतीची वेळ असल्याने हत्ती बिथरेल असे वर्तन करू नका असे सांगून पांगवण्याचा प्रयत्न केला. याबाबत वन विभागाने तात्काळ उपायोजना करावी अशी मागणी होत आहे. परिसरात वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून असले तरी या हत्तींचा प्रवास शेजारच्या बेळगावच्या दिशेने चालू आहे.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध

Spread the love  गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *