बिदर : बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील सेवानगर तांडाजवळ टाटा एस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
दस्तगिर दावलसाब (३६), रशिदा सैक (४१), टाटा एस चालक वली (३१) आणि अमाम सैक (५१) अशी मृतांची नावे आहेत. उदगीरहून हैदराबादकडे टाटा एस वाहनातून एकूण 14 जण प्रवास करत होते. यामध्ये 5 महिला आणि 3 मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारातून परतत असताना पहाटे साडेचारच्या सुमारास टाटा एसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकला धडक बसली. या धडकेत टाटा एसचा पूर्ण चुराडा झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित जखमी झाले आहेत.
जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बिदर येथील ब्रीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृतक महाराष्ट्रातील उगीर येथील असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना धन्नूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून एसपी चिन्नबसवण्णा यांनी अपघातस्थळी भेट देऊन तपास केला.