एनआयएचे पथक पुण्यात दाखल
पुणे : बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता या बॉम्बस्फोटाचे पुणे कनेक्शन समोर आलं आहे. हा बॉम्बस्फोट घडवून आणणारा संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एनआयएने हा संशय व्यक्त केला असून त्यांचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. एनआयएकडून पुण्यातील कोंढवा भागात या संशयीताचा शोध घेण्यात आला. मात्र कोंढव्यातील कोणत्या इमारतीत हा शोध घेण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यापूर्वी अनेक दहशतवादी पुण्यातील कोंढवा परिसरात सापडले आहेत. त्यामुळे हा आरोपी पुण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर हा दहशतवादी कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला, त्यानंतर बस बदलून तो गोकर्णमार्गे पुण्यात आल्याचा संशय आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतील ब्रूकफील्ड या उच्चभ्रू परिसरातील रामेश्वरम कॅफेत एक मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात 10 व्यक्ती जखमी झाले होते. त्या स्फोटाचा तपास एनआयएकडून सुरु करण्यात आला. पुण्यात नेमका कोणत्या इमारतीत एनआयए तपास करत आहे. याची कोणतीही माहिती अजून समोर आली नाही आहे.