निपाणी : चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांची बेळगाव येथील बुडाच्या (बेळगाव नगर विकास प्राधिकरण) अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली. दरम्यान चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान चिंगळे हे उद्या (दि.१६) सकाळी पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
लक्ष्मण चिंगळे यांनी यापूर्वी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदासह अपेक्स व बेळगाव डीसीसी बँकेचे संचालक पदावरही काम केले आहे. ते काँग्रेसचे निष्ठावंत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
चिंगळे यांनी आतापर्यंत पक्षासाठी दिलेल्या योगदानाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी चिकोडी जिल्हा ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडून चिकोडी लोकसभा मतदारसंघातून गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आठ पैकी सहा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान त्यांच्या निवडीचे वृत्त कळताच निपाणीसह तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.