बंगळूर : बंगळुरहून गोकर्णकडे भरधाव वेगात जाणारी एक खासगी बस आज पहाटे होलकेरे शहरात पलटी होऊन चार प्रवासी जागीच ठार तर ३८ जण जखमी झाले.
अपघातातील मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. शिमोगा जिल्ह्यातील सागर येथील गणपती (वय ४०) आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर येथील जगदीश यांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोन मृतांची ओळख पटलेली नाही.
३८ जखमी प्रवाशांपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असून उर्वरित धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातातील जखमींना तात्काळ तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवण्यात आले.
बंगळुरहून गोकर्णाकडे निघालेल्या पन्नास प्रवाशांसह एका खासगी बसवर पहाटे होलकेरे येथील अंजनेयस्वामी मंदिराजवळ नियंत्रण सुटले आणि ती उलटली.
वृत्त समजताच होलकेरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी रस्त्याचे अशास्त्रीय काम अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप केला.