बेळगाव : बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी मंगळवारी कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. लोकसभेच्या उमेदवारांसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यानी बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातील परिस्थितीची माहिती दिली तसेच समितीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती दिली. प्रारंभी बेळगाव लोकसभा मतदार संघातील महादेव पाटील आणि कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी शाहू महाराजांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे आता फक्त आशीर्वाद देत आहे मात्र येणाऱ्या काळात सीमाभागातील मराठी भाषिकांची भेट घेऊन चर्चा केली जाईल अशी माहिती दिली. यावेळी शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव आबासाहेब दळवी, विकास कलघटगी, बाळासाहेब शेलार, मुकुंद पाटील, गुरुराज देसाई आदी उपस्थित होते.