राजू पोवार; निपाणीत बैठक
निपाणी (वार्ता) : प्रत्येक पाच वर्षांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होतात. प्रत्येक वेळी उमेदवार विकास कामांच्या आश्वासनासह शेतकऱ्यांना नवनवीन योजनांचा लाभ देणार असल्याचे सांगतात. पण देशाचा अन्नदाता म्हणून समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याकडे मात्र निवडणुकीनंतर सर्वच नेते मंडळींचे दुर्लक्ष होते. त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांचे हित जोपासणारा खासदार हवा, असे मत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. निपाणीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभावासह विविध योजनांचा लाभ मिळावा, शेतकऱ्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या आंदोलन झाले. पण सदरचे आंदोलन चिरडून काढण्याचा प्रयत्न झाला. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. दरवर्षी अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊनही शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे अन्नदाता वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईतच लोटत आहे.
नगदी पिकासह भाजीपाल्यालाही अनेक वेळा खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतीमालावर नियंत्रण समिती स्थापन करून पिकांना हमीभाव देणारा खासदार असणे आवश्यक आहे. याशिवाय नद्यांना बारमाही पाणी, २४ तास वीज पुरवठा केल्यास अन्नदाता जगणार आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निवेदने, आंदोलने रास्ता रोको करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे गेल्या दहा वर्षात शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आता निवडून येणाऱ्या खासदारांनी तरी अन्नदात्याकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आवाहनही पोवार यांनी केले.