बेळगाव : दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी जलकुंभांचे नमुने घेऊन त्यांची चाचणी करावी. पाणी पिण्यायोग्य असेल तरच पुरवठा करावा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सोमवारी (१५ जुलै) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
ते म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागातील जलस्रोतांची शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांनी आणि पीडीओने सक्तीने तपासणी केली पाहिजे.
विविध तालुक्यांमध्ये इंदिरा कॅन्टीन उभारण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
घनकचरा व्यवस्थापन युनिट स्थापनेसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.
शेजारच्या महाराष्ट्रासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याने संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी आणि इतर अधिकारी सज्ज असावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
बैठकीला उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा नगरविकास कक्षाचे नियोजन संचालक मल्लिकार्जुन कलादगी, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, समाज कल्याण विभागाचे सहसंचालक नवीन शिंत्रे, अन्न विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.