मांजरी : मुलांना अभ्यासाबरोबर आपली संस्कृती आणि परंपरा समजावी या उद्देशाने जय जिनेन्द्र शिक्षण संस्थेच्या श्री. के. पी. मग्गेण्णावर इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी व मोहरम या सणाचे औचित्य साधून आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शितलकुमार मग्गेण्णावर हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अंकुश शितोळे यांनी केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मिणी व वारकरी अशी वेशभुषा साकारून पंढरीची वारी काढली. यावेळी मुख्याध्यापिका नजमा नेजकर, सहशिक्षिका अलका कदम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, आपली परंपरा आणि संस्कृती ही आपली ओळख आहे व आपण ती जपली पाहिजे. सणाचे महत्त्व मुलाना समजावे यासाठी शाळेमध्ये प्रत्येक पारंपारिक सण साजरे करुन मुलांना या सणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पाटील यांनी केले तर आभार शिवलीला कोकणे यांनी मानले.