बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी न्यायालयीन कामकाजाला वेग देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून बैठक बोलावण्यात येईल, अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली. पवारसोमवारी अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी बेळगावात आले होते. त्यावेळी मराठा मंदिर कार्यालयात मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा दाव्याला चालना मिळालेली नाही. मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांनी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचे काम पाहणाऱ्या वकिलांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही समन्वय मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पाठपुरावा करत आहे. पण, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समिती नेत्यांनी सांगितले. त्यावर सीमाप्रश्नी लवकर मुंबईत बैठक बोलावण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण न्यायालयीन प्रक्रियेला चालना देण्याबाबत चर्चा करू, त्यावेळी समिती नेत्यांनी मुंबईत हजर राहावे, असे पवार यांनी सांगितले.
यावेळी मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, दिनेश ओऊळकर, दत्ता उघाडे, मनोहर हुक्केरीकर, गोपाळ देसाई, विकास कलघटगी, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुसकर, ऍड. अमर येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.