निपाणी (वार्ता) : येथील जोशी गल्लीतील मिरची बाजारात परिसरातील व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यामुळे या बाजाराची अवस्था गंभीर बनली आहे. परिसरातील व्यापारी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असूनही येथून कचरा उचलला जात नसल्याने येथून ये,जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्याची तात्काळ दखल घेऊन परिसरात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर नगरपालिकेने कारवाई करावी. याशिवाय साठणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी ४-जे आर ह्यूमन राइट्स केअर ऑर्गनायझेशनने केली आहे. त्याबाबतचे निवेदन नगरपालिका आयुक्त दीपक हरादी यांना सोमवारी (ता.९) देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, पावसाळा वगळता जोशी गल्ली परिसरातील रिकाम्या जागेत निरंतरपणे प्रत्येक आठवड्याला मिरची बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर काही व्यापारी व नागरिक या परिसरात कचरा आणून टाकत आहेत. याशिवाय प्लास्टिक पिशव्यांचा खच पडत आहे. नगरपालिकेतर्फे या परिसराची स्वच्छता होत असल्याने दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करून परीसर स्वच्छ ठेवावा. याशिवाय येथे पुन्हा कचरा टाकला जाणार नाही, यासाठी तोडगा काढणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती आरोग्य विभागाचे सचिव, बेळगाव येथील आरोग्य खात्याचे आयुक्त, बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनावर ज्ञानेश्वर चव्हाण, प्रशांत पाटील, सचिन पवार, अशोक खांडेकर, विद्याश्री फुटाणे, राहुल ताडे यांच्या सह्या आहेत.