निपाणी परिसरातील चित्र; गणेशोत्सव देखाव्यांची परंपरा दुर्मिळ
निपाणी (वार्ता) : सळसळत्या उत्साहाचे प्रतीक आणि भक्ती भावाचा समजला जाणारा गणेशोत्सव सुरू झाला आहे. अनेक परंपरा असणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी सजीव देखावे सादर करून प्रबोधन करत होते. पण गेल्या काही वर्षापासून त्याऐवजी आकर्षक विद्युत रोषणाई, गणेश मूर्ती आणि महाप्रसादावर भर दिला जात असल्याचे चित्र निपाणी आणि ग्रामीण भागात दिसत आहे.
निपाणी भागातील सार्वजनिक गणेशोत्सवावर शेजारच्या कोल्हापूर आणि बेळगावची छाप आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी तर भाविकांच्या रांगा लागायच्या. ग्रामीण भागातून ग्रामस्थ बैलगाड्या करून देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी करत होते. त्यांचाच आदर्श घेऊन ग्रामीण भागातील नव्या मंडळांनीही देखावे साकारण्याची परंपरा जपली. चित्तवेधक देखावा उभारण्यासाठी विविध मंडळांतील कार्यकर्त्यांत कमालीची चढाओढ होती. तांत्रिकसह सजीव देखाव्याची प्रथा रुढ झाली होती.
घरगुती गणरायाचे विसर्जन झाले की सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहायला नागरिक बाहेर पडत होते. दशकभरात ही पंरपरा कमी झाली आहे. पण, परंपरा लक्षात घेऊन आजही काही मोजक्या मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविक आवर्जून गर्दी करतात. वाढलेली महागाई आणि उपलब्ध आर्थिक सुविधांच्या पार्श्वभूमीवर मंडळे यंदा या परंपरेकडे वळणार का, याचे औत्सुक्य आहे.
——————————————————————-
देखाव्यांतून संस्कार
देखाव्यांच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यावर विविध संस्कार होतात. तांत्रिक देखाव्यातून श्रम संस्कारांसह कल्पकता वाढीला लागते. काही मंडळांच्या सजीव देखाव्यातून अभिनयाचे धडे हौशी कलाकारांकडून गिरविले जात होते. यामुळे देखाव्यांतून मंडळाच्या ज्येष्ठांकडून नव्या पिढीला संस्कार आणि प्रबोधनाची मिळणारे शिदोरी आता नाहीशी झाली आहे.
——————————————————————–
अक्कोळमध्ये परंपरा टिकून
अनेक दशकापासून अक्कोळमध्ये गणेशोत्सवानिमित्त सर्वच मंडळ विविध प्रकारचे देखावे सादर करतात. यंदाही सर्वच मंडळांनी देखाव्यांची परंपरा कायम ठेवली असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन दिवसात देखावे नागरिकांसाठी खुले होणार आहेत.