निपाणी (वार्ता) : संकेश्वर मधील खाजगी बाजार बंद करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी संकेश्वर येथील एपीएमसी आवारात निदर्शने केली. याची माहिती मिळताच बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर एपीएमसी आवारातच मार्केट सुरू करण्यात आल्याने रयत संघटनेच्या आंदोलनाला यश आले त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, स्वामीजींच्या बरोबर आपण चर्चा केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. खासगी व्यापार बंद केला असून शेतकऱ्यांनी शासनाच्या एपीएमसी मार्केटमध्ये व्यवसाय करण्याचे आवाहन केले.
रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून खासगी मध्यस्थ शेतकऱ्यांची फसवणूक करून जास्त पैसे मिळवत आहेत. याशिवाय ते वजनातही फसवणूक करत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचे सांगितले.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी, पोलिस विभाग शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे खासगी बाजार बंद करण्याची सूचना करणार असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष चुन्नापा पुजारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोकाकचे डीएसपी दुदपीर मुल्ला, तहसीलदार मंजुळा नायक, आशा जुडदार, बसवराज बिजुर, संजिव हवन्नावर, पांडुरंग बीरनागड्डी, महेश सुभेदार, मल्लाप्पा दुकान, गोपाळ कुकनूर, प्रकाश पुजेरी, महादेव संसुध्दी, संगमेश सागर, फारुख किलेदार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.