बेळगाव : कर्नाटकाच्या जोखंडात असलेला मराठी सीमाभाग लवकरात लवकर महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना बुधवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. ज्योती महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी खासदार शाहू महाराज आले असताना त्यांची मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
गेल्या ६८ वर्षापासून कर्नाटकाच्या कानडी वरवंट्याखाली सीमाभाग आहे. येथील मराठी भाषिकांवर दिवसेंदिवस कानडी वरवंटा अधिक होत आहे. येथील दुकानावरील व सार्वजनिक फलकावरील कन्नडसक्ती दिवसेंदिवस तीव्र होत आहे. यामुळे मराठी भाषिकांची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सीमाप्रश्न हा न्यायप्रविष्ठ आहे, यासाठी महाराष्ट्र सरकार व सीमावासियांच्या वतीने हा प्रश्न गेल्या वीस वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. सदर न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी व येथील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी खा. शाहू महाराजांनी पाठपुरावा करावा व लोकसभेत मराठी भाषिकावरील अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर व खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी खासदार शाहू महाराजांना केले.
यावेळी छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, हा सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असून गेल्या अनेक वर्षांपासून येथील मराठी जनता स्वतःच्या माय मराठी राज्यात जाण्यासाठी आत्मीयतेने लढत आहे. सदर प्रश्नासाठी मी खासदार झाल्यापासून माझ्यावतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संसदेत या प्रश्नाचे वेळोवेळी लक्ष वेधून आवज उठवेन, तसेच येथील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य ऍड. राजाभाऊ पाटील, ऍड. एम. जी. पाटील, रावजी पाटील, रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले, मनोहर संताजी, शुभम शेळके, लक्ष्मण होनगेकर, गोपाळ पाटील, पांडू सावंत, प्रकाश अष्टेकर, पांडू पट्टण, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. अमर येळ्ळूरकर, दिगंबर पवार, नेताजी जाधव, दीपक पावशे, मदन बामणे, नारायण सांगावकर, नीलश शिंदे, बाबू कोले आदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.