बेळगाव : आज देशभरात नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली होती. आज पहिल्या दिवशी देव, देश आणि धर्माच्या रक्षणाची जनजागृती करून श्री दुर्गामाता दौड यशस्वीरीत्या संपन्न झाली.
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात १० दिवस देवीचा जागर केला जातो. याचदरम्यान श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून बेळगाव शहरात नवरात्रीदरम्यान श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. यावेळीही श्री दुर्गामाता दौड मोठ्या थाटामाटात सुरू झाली असून शहरातील शामाप्रसाद मुखर्जी रोड, छ. शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दौडची सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गा माता दौडच्या स्वागतासाठी काल रात्रीपासून महिलांनी आणि उत्साही कार्यकर्त्यांनी दौड मार्ग सजवला होता. आकर्षक रांगोळ्या, तिरंगा आणि भगवे ध्वज, भगवे फेटे अशा वातावरणात शेकडो धारकऱ्यांनी दुर्गा माता दौड साजरी केली. श्री दुर्गामाता दौडचे गल्लोगल्ली सुवासिनींनी आरती ओवाळून स्वागत केले. दौड मार्गावर शिवकालीन वेशभूषेत अनेक चिमुकल्यांसह शिवप्रेमींनी वातावरण भारावले होते. सदर दौड आज छत्रपती शिवाजी उद्यानापासून सुरु होऊन विविध गल्लीमार्गे येऊन श्री क्षेत्र दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात येऊन सांगता झाली.