पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी
निपाणी (वार्ता) : येथील पाणी प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी किमान दिवसाला दोन तास तरी पाणी मिळावे, यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. शिवाय निवेदने दिली गेली. तरीही कोणतीच कार्यवाही न झाल्याने नागरी हक्क कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते, झाकीर कादरी, प्रा. बाळासाहेब सुर्ववंंशी आणि काही नगरसेवकांनी गुरुवारी (ता.१०) नगरपालिकेसमोर आत्मक्लेष आंदोलन केले. दुपारच्या सत्रात शहराध्यक्ष नगरसेवक आणि नागरिकांनी एकत्रित बसून चर्चा केल्यानंतर पाणी प्रश्नाबाबत जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून कमिटी पाठवून देऊन योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. त्याबाबाची लेखी पत्र ही देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे देण्यात आले.
शहरात पूर्ण क्षमतेने २४ तास पाणी योजना सुरू नाही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा अनेक महिने पाणी सोडण्यात आले. तरीही मीटर प्रमाणे पाणीपट्टी आकारली जात आहे. ती अन्यायकारक असून पूर्वीप्रमाणे वर्षाला पाणीपट्टी भरून घेण्याची मागणी सर्वांनी केली होती. याशिवाय नव्या पाणी योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्याबाबत निवेदनेही दिली होती.
यावर्षी जवाहर तलाव ४६ फुटावरून दोन वेळा झाला आहे पण त्यामध्ये २१ फूट गाळ आहे. हे वास्तव असून सुद्धा त्याच्यावर उपाययोजना केली जात नाही. त्याशिवाय अनेक ठिकाणी हॉल्व नाहीत. त्यामुळे कमी जास्त दाबाने पाणी मिळते. या सर्वांचा विचार करून निपाणीला शुद्ध आणि शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी नगरसेवकासह नागरिकांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर दोन दिवसात संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पथक येऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. दोन दिवसात याबाबत कार्यवाही सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सहकारत्न उत्तम पाटील यांनी आत्मक्लेष आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र दिले आहे.
त्यावेळी प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्ष सोनल कोठडीया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती डॉ. जसराज गिरे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई -सरकार, रवींद्र शिंदे, शेरू बडेघर, दिलीप पठाडे, शौकत मनेर, राजू गुंदेशा, अस्लम शिकलगार, नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, राजकुमार मेस्त्री, आयुक्त दीपक हरदी, झाकीर कादरी, प्रा. एन. डी. जत्राटकर यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.