बेळगाव : बेळगावच्या संतोष पद्मन्नावर या उद्योजकाच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनव्या खळबळजनक बातम्या उघडकीस येत असून संतोष पद्मन्नावर हा वासनांध होता आणि त्याच सवयीमुळे पत्नीने त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
पतीच्या खूनप्रकरणी पत्नी उमा पद्मन्नावरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले खरे. परंतु यामागे असलेल्या कारणांकडे डोळेझाक करून चालणार नाही. पतीचा खून का केला असावा? या प्रश्नाच्या खोलवर जाता मृत संतोष पद्मन्नावर हा वासनांध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या विकृतपणामुळे वैतागलेल्या पत्नीने अखेर त्याचा शेवट करायचा कट रचला. संतोष पद्मन्नावर हा खाजगी सावकारी करत होता. व्याजाने दिलेल्या रकमेची परतफेड न केल्यास अनेक महिलांना त्याने आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत घालविलेल्या खाजगी क्षणांचे व्हिडीओ देखील त्याने काढल्याची माहिती समोर आली आहे. चक्रीवाढव्याजाचा सावकारी धंदा करणाऱ्या संतोष पद्मन्नावरचे अनेक महिला आणि कॉलगर्ल्स सोबत अनैतिक संबंध होते. ज्यांना कर्जाची परतफेड जमली नाही अशा महिलांना घरी बोलावून त्यांच्यासोबत अनैतिक संबंध ठेवून त्याचे व्हिडीओ बनवून आपल्या पत्नीलाच व्हिडीओ दाखविण्याची विकृत मानसिकता संतोष पद्मन्नावरकडे होती. त्याच्या या वागणुकीला त्रस्त झालेल्या पत्नीने अखेर आपल्या मित्राच्या सहकार्याने त्याच्या खुनाचा कट रचला असल्याची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर, दांडेली येथील रिसॉर्टसह स्वतःच्या घरी देखील कित्येक महिलांना बोलावून त्याने विकृत कृत्य सुरूच ठेवले होते. दररोज सुरु असणाऱ्या या कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ देखील त्याने आपल्याकडे ठेवले होते. त्याच्याजवळील १३ हार्ड डिस्क पोलिसांच्या हाती लागल्या असून आपल्या पतीच्या या कृत्याला वैतागलेल्या पत्नीने अखेर त्याचा खून केला आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू भासविण्याचा प्रयत्न, त्यानंतर मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सुरु झालेला तपास, मृतदेह उकरून पुन्हा शवविच्छेदन, शवविच्छेदनानंतर पुन्हा तपास आणि यामध्ये स्पष्ट झालेला खून याप्रकरणी आरोपींना देखील अटक झाली. मात्र या प्रकरणात आणखी एक खळबळजनक माहिती समोर आल्यामुळे आता फिर्याद दिलेल्या मुलीलाच आपण केलेल्या गोष्टीचा पश्चाताप वाटत असेल, अशी चर्चा आहे. आपल्या पतीने केलेल्या कृत्याचा आपल्या मुलांच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी पत्नीने कठोर पाऊल उचलले. पतीच्या खून प्रकरणी गुन्हेगाराच्या भूमिकेत उभी असलेली आरोपी पत्नी उमा हिने खुनाचा निर्णय घेतला. मात्र आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तिने या दुष्कर्माचा शेवट केल्याचे बोलले जात असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.